उदगीर येथील बसस्थानक पुर्नबांधणी कामासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर
*उदगीर* : उदगीर शहरात गेल्या वर्षभरापासून अत्याधुनिक बस स्थानकाचे काम सुरू असून यामध्ये राहिलेल्या सुविधा व उदगीर व जळकोट मतदार संघात ये - जा करणाऱ्या महामंडळाच्या एस.टी. बसेसची कमतरता आदीसह राहिलेले उर्वरित प्रश्न तात्काळ सोडून उदगीर व जळकोट मतदार संघातील प्रवाशांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी माजी मंत्री तथा उदगीर जळकोट मतदार संघाचे आमदार संजय बनसोडे यांनी राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मंत्रालयात भेट घेऊन केली होती. त्यांच्या मागणीला यश आले असुन उदगीर येथील बसस्थानक पुर्नबांधणी कामासाठी ३ कोटी ५० लक्ष रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला असल्याची माहिती माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर मतदार संघ हा तीन राज्याच्या सीमेवर असल्याने येथे नागरिकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते.
या निधीमुळे उदगीर येथील बसस्थानकाचे काम लवकर होवून प्रवाशांच्या सेवेत अत्याधुनिक बसस्थानक निर्माण होणार आहे. यामुळे विद्यार्थी व नागरिकांची सोय होईल असा विश्वास आ.संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
याचबरोबर महामंडळाच्या उपलब्ध असणाऱ्या बसेस ह्या कमी पडत आहेत तर काही बसेस नादुरुस्त व काही मोडकळीस आले असल्याने या भागातील प्रवाशांना प्रवास करताना अडचण निर्माण होत आहे. उदगीर व जळकोट शहरात बस स्थानकाचे काम सुरू असून त्या कामाचा आढावा घेऊन राहिलेले उर्वरित प्रश्न सोडवणार असल्याचेही आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
उदगीर बसस्थानकाला निधी मंजूर केल्याबद्दल परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत तर उदगीर बसस्थानकाला निधी मंजूर करुन घेतल्याबद्दल आ.संजय बनसोडे यांचे उदगीर मतदार संघातील जनतेने अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.


0 Comments