*पेरणी, रोग नियंत्रणाबाबत जनजागृतीसाठी विशेष मोहीम राबवा-जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
• माती परीक्षण, पीक पेरणीविषयी होणार मार्गदर्शन
• बोगस खते, बियाणे विक्री रोखण्यासाठी पथके स्थापन करण्याच्या सूचना
लातूर, दि. २५ : शेतकऱ्यांना विविध पिकांच्या पेरणीची योग्य वेळ आणि पद्धत, त्या पिकांवर येणारे रोग आणि त्याअनुषंगाने करावयाच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना याविषयी सविस्तर माहिती देण्यासाठी कृषि विभागाने विशेष मोहीम राबविण्याच्या सूचना जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बैठक सभागृहात झालेल्या खरीप हंगाम पूर्वतयारी आढावा बैठकीत त्या बोलत होत्या.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर, लातूर शहर महानगरपालिका आयुक्त बाबासाहेब मनोहरे, सहायक जिल्हाधिकारी नमन गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव, कृषि विद्यावेत्ता अरुण गुट्टे, कृषि विज्ञान केंद्राचे प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. दिग्रसे सचिन, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक प्रमोद शिंदे, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था संगमेश्वर बदनाळे, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता बी. आर. शेलार, कृषि विकास अधिकारी एस. आर. चोले, सर्व उपविभागीय कृषि अधिकारी व सर्व तालुका कृषि अधिकारी यावेळी उपस्थिती होते.
शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची वेळ येवू नये, यासाठी पुरेसा पाऊस झाल्यावरच पेरणी होणे आवश्यक आहे. याविषयी कृषि विभागाने शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करावी. तसेच पीक पेरणीची योग्य पद्धत, बियाणांची निवड आणि पेरणीपूर्व प्रक्रिया, पेरणीचा योग्य कालावधी आदी बाबींची माहिती शेतकऱ्यांना देण्यात यावी. जिल्ह्यात बोगस बियाणे आणि खते यांची विक्री होवू नये, यासाठी पथके स्थापन करून आवश्यक कार्यवाही करावी. तसेच पेरणीच्या प्रस्तावित क्षेत्राच्या प्रमाणात बियाणे, खते उपलब्ध करून देण्यासाठी सूक्ष्म नियोजन करावे, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
सोयबीनवर शंखी गोगलगाय, पिवळा मोझॅक आणि तूर पिकावर मर रोग येत असल्याचे गेल्या काही हंगामात दिसून आले आहे. या रोगांना प्रतिबंध करण्यासाठी शेतकऱ्यांनी काय करावे आणि काय करू नये, याबाबत माहिती देणे आवश्यक आहे. कृषि विभागाने विविध माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्यांपर्यंत पोहचूनत्यांना आवश्यक उपाययोजना करण्याबाबत मार्गदर्शन करावे. जीआय मानांकन मिळालेल्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी दिल्या.
*खरीप हंगामात ६ लाख ५९ हजार हेक्टरवर पेरणीचे नियोजन*
यंदाच्या खरीप हंगामात ६ लाख ५९ हजार ७०० हेक्टरवर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. यामध्ये सोयाबीन ४ लाख ९० हजार हेक्टर, तूर ७५ हजार हेक्टरवर आणि खरीप ज्वारी १० हजार हेक्टरवर पेरणी होणे अपेक्षित आहे. याकरिता आवश्यक खते, बियाणे यांचे नियोजन करण्यात आले आहे. २० एप्रिलपर्यंत जिल्ह्यात ७७ हजार ३५३ मे. टन रासायनिक खते उपलब्ध झाली असल्याचे जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी सांगितले.
*पिकांवरील रोगांच्या प्रतिबंधासाठी होणार जनजागृती*
खरीप हंगामात सोयाबीन, तूर पिकांवर येणाऱ्या विविध रोगांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कृषि विभागामार्फत जनजागृती करण्यात येणार आहे. याकरिता तयार करण्यात आलेल्या भित्तीपत्रिकांचे प्रकाशन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांच्या हस्ते करण्यात आले. लातूर जिल्हामध्ये सोयाबीन हे प्रमुख पिक असून सलग सोयाबीन न घेता सोयाबीन, तूर आंतरपीक तसेच तूर पिकाच्या सुधारित वाणाचा वापर करणे, शंखी गोगलगायीच्या प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करणे, रुंद सारी वरंबा पद्धती, टोकन पद्धतीचा अवलंब करण्याबाबतचे नियोजन बैठकीत जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी आर. टी. जाधव यांनी यांनी पीपीटीद्वारे सादरीकरण केले. कृषि उपसंचालक महेश क्षीरसागर यांनी आभार मानले.
0 Comments