उदगीरसाठी ४०० कोटींच्या ४-लेन रिंगरोडला मंजुरी
*उदगीर* : उदगीर शहराच्या वाहतूक व्यवस्थेला गती देणारा आणि शहराच्या विकासाला नवी दिशा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय शासनाने घेतला असून उदगीरसाठी सुमारे ४०० कोटी रुपये खर्चाच्या ४-लेन रिंगरोड प्रकल्पास मंजुरी मिळाली आहे. या प्रकल्पासाठी माजी मंत्री तथा आमदार संजय बनसोडे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले असल्याने उदगीर शहर व परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
उदगीर शहरातून दररोज मोठ्या प्रमाणात अवजड व हलक्या वाहनांची वाहतूक होत असते. शहरातील वाढती लोकसंख्या, व्यापारी उलाढाल आणि ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहनांमुळे वाहतुकीचा ताण दिवसेंदिवस वाढत होता. त्यामुळे शहरात वाहतूक कोंडी, अपघातांची शक्यता आणि नागरिकांना होणारा त्रास यामध्ये वाढ झाली होती. ही समस्या लक्षात घेऊन आमदार संजय बनसोडे यांनी मागील अनेक वर्षापासुन शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून उदगीरसाठी स्वतंत्र ४-लेन रिंगरोडची मागणी केली होती. त्यांच्या या मागणीला यश मिळाले आहे.
मंजूर झालेल्या या रिंगरोडमुळे शहराबाहेरील वाहतूक शहरात न येता थेट आपल्या मार्गाने पुढे जाऊ शकेल. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून प्रवास अधिक सुरक्षित आणि जलद होणार आहे. तसेच औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी विकासाला चालना मिळून उदगीर शहराच्या सर्वांगीण प्रगतीसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.
या प्रकल्पामुळे शहराच्या विविध भागांना अधिक चांगली जोडणी मिळणार असून भविष्यातील वाहतूकीची गरज लक्षात घेऊन सदर रिंगरोड उदगीरच्या विकासाचा नवा अध्याय ठरेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
रिंगरोडच्या दोन्ही बाजूंना भविष्यात व्यावसायिक संकुले, औद्योगिक प्रकल्प आणि विविध विकासकामांना गती मिळण्याची शक्यता आहे.
उदगीर शहराच्या दीर्घकालीन विकासासाठी रिंगरोड अत्यंत आवश्यक होता. नागरिकांची मागणी आणि भविष्यातील गरज लक्षात घेऊन शासनाकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला. शासनाने या मागणीची दखल घेत ४०० कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास मंजुरी दिली असून यामुळे उदगीरच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे असल्याचे आ.संजय बनसोडे यांनी सांगितले आहे.
या निर्णयाबद्दल उदगीर व परिसरातील नागरिक, व्यापारी, वाहनधारक आणि विविध सामाजिक संघटनांनी समाधान व्यक्त करत आमदार संजय बनसोडे यांच्या प्रयत्नांचे स्वागत केले आहे. शहराच्या पायाभूत सुविधांच्या विकासाच्या दृष्टीने हा निर्णय ऐतिहासिक ठरणार असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.
सदर रिंगरोड मंजुर केल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, उदगीरचे सुपुत्र अमोल पाटील कौळखेडकर यांचे आ.संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.


0 Comments