राज्यात तुकाराम मुंढे... तर उदगीरमध्ये दबंग महिला पोलीस कर्मचारी सोनाली ढगे; वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी कायम रस्त्यावर!
उदगीर:राज्यात प्रशासनातील कर्तव्यदक्ष आणि शिस्तप्रिय अधिकाऱ्यांमध्ये जसे तुकाराम मुंढे यांचे नाव घेतले जाते, त्याच धर्तीवर उदगीर शहरात वाहतूक शिस्तीसाठी अहोरात्र रस्त्यावर उतरलेल्या उदगीर शहर पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस कर्मचारी सोनाली ढगे यांची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे.
उन्हाचा तडाखा असो, पाऊस असो किंवा गर्दीची वेळ असो, सोनाली ढगे या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी सतत चौका चौकात दिसतात. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करतानाच नागरिकांना वाहतुकीचे नियम समजावून सांगण्याचे कामही त्या प्रभावीपणे करत आहेत.
शहरातील प्रमुख चौकांमध्ये वाहतूक सुरळीत ठेवणे, हेल्मेट व सीटबेल्टचा वापर, चुकीच्या पद्धतीने वाहन उभे करणाऱ्यांवर कारवाई आणि नागरिकांमध्ये वाहतूक नियमांविषयी जनजागृती अशा विविध माध्यमांतून त्या शिस्तीचा संदेश देत आहेत. त्यांच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत सकारात्मक बदल जाणवत असल्याची प्रतिक्रिया अनेक नागरिक व्यक्त करत आहेत.
कर्तव्याप्रती असलेली निष्ठा, धाडसी कार्यपद्धती आणि शिस्तीबाबत कोणतीही तडजोड न करण्याची भूमिका यामुळे सोनाली ढगे यांनी उदगीरकरांच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले आहे. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी रस्त्यावर सातत्याने सक्रिय असलेल्या या दबंग महिला पोलीस कर्मचाऱ्यांचे नागरिकांकडून कौतुक होत असून, त्यांच्या कार्यामुळे इतर कर्मचाऱ्यांनाही प्रेरणा मिळत असल्याचे बोलले जात आहे.


0 Comments