अतनुरात खरीप हंगाम पुर्व प्रशिक्षण संपन्न
जळकोट:येथे कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा 'आत्मा' यांच्या संयुक्त विद्यमाने खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन 'श्रीराम मंगल कार्यालय' अतनूर येथे शनिवारी दि.२ जून रोजी करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच बाबुराव कापसे हे उपस्थित होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून आत्माचे प्रकल्प संचालक लातूरचे शिवसांब लाडके, कृषी विद्यावेता कृषी महाविद्यालय लातूरचे डॉ.अरुण गुट्टे, उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र काळे होते. तर प्रमुख उपस्थितीत तालुका कृषी अधिकारी आकाश पवार, कृषी पर्यवेक्षक नानासाहेब धुपे, तलाठी अतिक शेख, जिल्हा संसाधन व्यक्ती डी.बी.शिंदे, कृषी सहाय्यक संदीप पाटील, नारायण तोर, आत्म्याचे तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक अभिलाष क्षिरसागर, तंटामुक्ती अध्यक्ष विकास सोमुसे-पाटील, पोलीस पाटील प्रकाश पाटील, कुणबी शेतकरी गटाचे अध्यक्ष तथा शेतकरी मित्र बी.जी.शिंदे अतनूरकर, साईबाबा शेतकरी बचतगट, कुणबी शेतकरी बचत गटातील सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी कृषी महाविद्यालय लातूरचे कृषी विधावेत्ता डॉ.अरुण गुट्टे यांनी सोयाबीन पिकाची पंचसूत्री सोयाबीन व खरीपातील पिकांची बीज प्रक्रिया सेंद्रिय खतांचा योग्य वापर, खत व्यवस्थापन, तनाचे योग्य व्यवस्थापन, कमी खर्चात जास्त उत्पादन कसे घ्यावे याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच गेल्या वर्षी सर्वात जास्त प्रादुर्भाव झालेल्या गोगलगाय या किडीचा प्रादुर्भाव, त्यांचे लक्षणे व गोगलगाय किडीचे व्यवस्थापन कशाप्रकारे करून आपले पीक सुरक्षित करावे, तुर मर रोग व त्यावरील उपाय याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. तसेच आत्माचे प्रकल्प संचालक लाडके यांनी खरीप हंगाम पूर्व प्रशिक्षण कार्यक्रमांमध्ये मार्गदर्शन करतेवेळी निंबोळी अर्क तयार करणे व त्याचा वापर कशाप्रकारे करावा. दशपर्णी अर्क, जीवामृत, बिजामृत चा वापर आपल्या शेतीमध्ये वाढविणे याबाबत मार्गदर्शन केले. तसेच आत्मा यंत्रणेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध बाबी, शेतकरी गट व शेतकरी उत्पादक कंपनी मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमाबाबत उपस्थित शेतकऱ्यांना सविस्तर असे मार्गदर्शन केले. उपविभागीय कृषी अधिकारी राजेंद्र काळे यांनी कृषी विभागाच्या विविध योजना, मागेल त्याला शेततळे, भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना, कृषी यांत्रिकीकरण, बांबू लागवड योजना, महाडीबीटी अशा विविध योजनेचे स्वरूप याविषयी सविस्तर असे मार्गदर्शन केले. यावेळी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्नप्रक्रिया योजनेअंतर्गत प्रकल्प मंजूर होऊन मिरची कांडप, दाल मिल, शेवया मशीन, या मशीनचे उद्घाटन प्रकल्प संचालक आत्माचे लाडके व उपविभागीय कृषी अधिकारी काळे यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी शास्त्रज्ञ डॉ.अरुण गोटे, तालुका कृषी अधिकारी आकाश पवार उपस्थित होते. यावेळी साईबाबा शेतकरी बचत गटाचे सदस्य राजकुमार रत्नपारखे यांच्या सेंद्रिय शेतीची व गांडूळ खत प्रकल्पाची मान्यवरांनी पाहणी करून कौतुक केले. यावेळी साईबाबा शेतकरी गटाचे अध्यक्ष शिवराज रेड्डी, बाबुराव कापसे, व्यंकट कल्पे, तानाजी सोमुसे, सोपान बारसुळे, योगेश चव्हाण, ज्ञानेश्वर संगेवार, दत्ता बिचकुंदे, इरबा गायकवाड, गुंडू
बोडेवार, माधव रेड्डी, राम रेड्डी, ईश्वर आतनुरकर, मधुकर पत्तेवार, राजकुमार रत्नपारखे, शकुंतला कापसे इत्यादी शेतकरी उपस्थित होते.
कार्यक्रमाला अतनूर, चिंचोली व परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कृषी सहाय्यक संदीप पाटील यांनी केले.तर आभार प्रदर्शन आत्माचे अभिलाष क्षीरसागर यांनी मानले.
0 Comments