Ad Code


 

महाराष्ट्रातील सर्व जिल्हा तालुका ग्रामीण भागात प्रसिद्ध होणारे ( विक्रांत ) मुंबई. पुणे. छत्रपती संभाजी नगर. नाशिक. नागपूर. लातूर. परभणी. नांदेड. सोलापूर. कोल्हापूर. कोल्हापूर. सातारा. सांगली. अहमदनगर. अकोला. जळगाव. गोवा... (नवीन आकर्षक डिझाईन मध्ये न्यूज ब्लॉग बनवून मिळेल ₹599)

Ticker

6/recent/ticker-posts

उदगीरच्या आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! आधी रुग्णांना सुविधा द्या, मग विकासाच्या गप्पा मारा – स्वप्निल अण्णा जाधव

उदगीरच्या आरोग्य व्यवस्थेचे तीनतेरा! आधी रुग्णांना सुविधा द्या, मग विकासाच्या गप्पा मारा – स्वप्निल अण्णा जाधव

सामान्य रुग्णालय केवळ रेफरिंग सेंटर; १४ कोटींचे वाढवणा ग्रामीण रुग्णालय दोन वर्षांपासून धूळखात, आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर शिवसेना (उबाठा) आक्रमक

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर विधानसभा मतदारसंघात विकासकामांच्या घोषणा आणि श्रेयवादाची स्पर्धा सुरू असताना दुसरीकडे सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न मात्र गंभीर बनला आहे. शासकीय रुग्णालयांमध्ये मूलभूत सुविधांचा अभाव, वैद्यकीय अधिकाऱ्यांची अनुपस्थिती, अस्वच्छता आणि कोट्यवधी रुपये खर्चून उभारलेल्या रुग्णालयाच्या इमारतीचा वापरच होत नसल्याने आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी विकासाच्या वल्गना करण्यापूर्वी जनतेच्या आरोग्याचा प्रश्न सोडवावा, असा घणाघात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उदगीर-जळकोट विधानसभा प्रमुख स्वप्निल अण्णा जाधव यांनी केला आहे.
उदगीर येथील २०० खाटांच्या सामान्य रुग्णालयाचा विस्तार करून ५०० खाटांचे रुग्णालय करण्याची मागणी केली जात आहे. मात्र सध्या उपलब्ध असलेल्या रुग्णालयातील सुविधांची अवस्था काय आहे, याकडे लक्ष देण्याची गरज आहे. रुग्णालयात आवश्यक वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याने रुग्णांना अन्यत्र पाठविण्याची वेळ येत असून, हे रुग्णालय प्रत्यक्षात रेफरिंग सेंटर बनल्याची टीका जाधव यांनी केली.
रुग्णालयातील आयसीयू आणि एनआयसीयू विभाग वारंवार बंद राहत असल्याच्या तक्रारी आहेत. स्वच्छतेचा अभाव, वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांची अनुपस्थिती आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. काही अधिकारी मुख्यालयात राहत नसतानाही घरभाडे भत्ता घेत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. या प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली.

१४ कोटींची इमारत तयार, मात्र रुग्णालय सुरू होण्याची प्रतीक्षा!

वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती तर आरोग्य विभागाच्या नियोजनावरच प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे. परिसरातील सुमारे १५ ते २० गावांतील नागरिकांना आरोग्य सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा वाढवून ग्रामीण रुग्णालयास मान्यता देण्यात आली. त्यानंतर शासनाने सुमारे १४ कोटी रुपये खर्च करून भव्य इमारत उभारली. मात्र बांधकाम पूर्ण होऊन दोन वर्षांहून अधिक काळ उलटूनही या रुग्णालयात प्रत्यक्ष उपचार सुरू झालेले नाहीत. त्यामुळे कोट्यवधींची इमारत असूनही रुग्णांना त्याचा उपयोग होत नसल्याची खंत जाधव यांनी व्यक्त केली.
विशेष म्हणजे, सार्वजनिक आरोग्य विभागाच्या २४ जून २०२४ रोजीच्या आदेशानुसार या ग्रामीण रुग्णालयासाठी २६ पदांना मंजुरी देण्यात आली आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, क्ष-किरण तंत्रज्ञ यांच्यासह विविध पदांचा त्यात समावेश आहे. तरीही वैद्यकीय अधीक्षकच अद्याप रुजू न झाल्याने रुग्णालय सुरू होण्याची प्रक्रिया रखडली आहे.
आरोग्य विभागाच्या ९ सप्टेंबर २०२० रोजीच्या आदेशानुसार उदगीरच्या सामान्य रुग्णालयातील डॉ. स्वाती सोनवणे यांची वाढवणा ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आल्याची माहिती आहे. मात्र त्यांना उदगीर येथून कार्यमुक्त करण्यात आले नसल्याने त्या वाढवणा येथे रुजू झालेल्या नाहीत, असा आरोप जाधव यांनी केला.

दारूच्या दुकानासमोर आरोग्य सेवा; महिलांची गैरसोय

ग्रामीण रुग्णालयाची नवीन इमारत धूळखात पडलेली असताना सध्या वाढवणा येथील आरोग्य सेवा गावातील स्थलांतरित उपकेंद्रातून दिली जात आहे. हे उपकेंद्र देशी दारूच्या दुकानासमोर तसेच बिअर बार आणि परमिट रूमच्या जवळ असल्याने महिला व लहान मुलांना तेथे जाणे गैरसोयीचे ठरत असल्याचे जाधव यांनी सांगितले. या ठिकाणी दररोज सुमारे २०० ते २५० रुग्ण उपचारासाठी येत असल्याने सुसज्ज ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
शासकीय निधी हा कोणत्याही लोकप्रतिनिधीच्या वैयक्तिक खिशातून आलेला नसून तो जनतेच्या करातून उभा राहिलेला आहे. त्यामुळे निधी कोणी आणला, याचे श्रेय घेण्यापेक्षा त्या निधीतून निर्माण झालेल्या सुविधांचा लाभ जनतेला मिळतो की नाही, हे पाहणे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. केवळ इमारती उभारून विकास झाल्याचे दाखविण्यापेक्षा त्या इमारतींमध्ये आरोग्य सेवा सुरू होणे महत्त्वाचे आहे, असेही जाधव म्हणाले.
उदगीर सामान्य रुग्णालयातील बंद सुविधा पूर्ववत सुरू कराव्यात, गैरहजर राहणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी, रुग्णालयातील स्वच्छतेचा प्रश्न सोडवावा आणि वाढवणा ग्रामीण रुग्णालय तातडीने सुरू करावे, अशा मागण्या त्यांनी शासन व संबंधित आरोग्य विभागाकडे केल्या आहेत.

अन्यथा शिवसेना आक्रमक आंदोलन करणार

सर्वसामान्य नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित प्रश्नांकडे शासन आणि लोकप्रतिनिधींनी गांभीर्याने लक्ष द्यावे. जनतेच्या मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून विकासाच्या मोठमोठ्या घोषणा करण्यात अर्थ नाही. शिवसेनेने उपस्थित केलेल्या प्रश्नांची दखल घेऊन तातडीने कार्यवाही न झाल्यास पक्षाला नाईलाजाने आक्रमक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही स्वप्निल अण्णा जाधव यांनी दिला आहे.

Post a Comment

0 Comments

जाहिरात