स्वतः च्या मुलीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांस जन्मठेप:उदगीर जिल्हा सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा
उदगीर:तालुक्यातील वाढवणा येथील पोलीस ठाण्यात गेल्या सहा वर्षांपूर्वी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. याची सुनावणी पूर्ण होऊन येथील जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. डी. सुभेदार यांनी मंगळवारी (ता.९) रोजी या नराधमास जन्मठेप व एक लाख रुपये दंडाची शिक्षा ठोठावली असल्याची माहिती सहाय्यक सरकारी वकील अँड एस एम गिरवलकर यांनी दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की ३ मे २०१८ रोजी घटनेतील संबंधित आरोपीने त्याच्या राहते घरी स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला होता. या घटनेची माहिती पीडीतेने तिच्या आईला सांगितल्यानंतर तीने थेट वाढवणा पोलीस ठाणे गाठले व फिर्याद दिली. या फिर्यादीच्या अनुषंगाने वाढवणा पोलीस ठाण्यास सदर आरोपी विरुद्ध बलात्कार व बाल लैंगिक अत्याचार प्रकरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस उपनिरीक्षक पी जी शिरसे यांनी सखोल तपास केला होता. सहाय्यक पोलीस निरीक्षक जी के शेख यांनी जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते. या प्रकरणात तब्बल अकरा जणांची साक्ष नोंदवण्यात आली होती. या साक्षी व उपलब्ध असलेल्या कागदपत्राच्या आधारे सहाय्यक सरकारी वकील अँड गिरवलकर यांनी केलेला युक्तिवाद ग्राह धरून जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री सुभेदार यांनी सदर आरोपीस जन्मठेप व एक लाख रुपये दंड, दंड नाही भरल्यास एक महिना सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली असल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
सदर गुन्हा नोंद झाल्यानंतर उदगीर येथील सजग नागरिकांनी शहरात मेणबत्ती मोर्चा काढून या नराधमास या कृत्याबद्दल कठोरात कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी केली होती.


0 Comments