*आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीत चेक पोस्ट, भरारी पथकांवर महत्वपूर्ण जबाबदारी-मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर*
लातूर, दि. 22 : जिल्ह्यात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी होण्यामध्ये विविध ठिकाणी स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्ट आणि भरारी पथकांची जबाबदारी महत्वाची असल्याचे जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी सांगितले.
चेक पोस्ट, भरारी पथक प्रमुखांच्या दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत श्री. सागर बोलत होते. जिल्हास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी तथा लातूर शहर महानगरपालिकेचे आयुक्त बाबासाहेब मनोहरे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी जावेद शेख यांच्यासह गट विकास अधिकारी तथा तालुकास्तरीय आदर्श आचारसंहिता कक्षाचे प्रमुख उपस्थित होते.
चेक पोस्ट, भरारी पथकामध्ये नियुक्त करण्यात आलेल्या सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी आपली जबाबदारी पारदर्शक आणि निःपक्षपातीपणे पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने संबंधितांवर गुन्हे दाखल करणे, पंचनामा करणे, व्हिडीओग्राफी करून पुढील कार्यवाही करावी. आदर्श आचारसंहितेचे नियम सर्वांसाठी समान असून यामध्ये कोणालाही सूट देता येणार नाही, असे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सागर म्हणाले. सर्व गट विकास अधिकारी यांनी तालुकास्तरावर चेक पोस्ट, भरारी पथक प्रमुखांच्या कामाचा नियमित आढावा घेवून त्यांच्यामार्फत करण्यात येणाऱ्या कार्यवाहीची माहिती घ्यावी, असे त्यांनी सांगितले.
प्रारंभी उमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेख यांनी चेक पोस्ट, भरारी पथक नियुक्तीचा उद्देश आणि या पथकातील सदस्यांच्या जबाबदाऱ्याविषयी माहिती दिली. महानगरपालिका आयुक्त श्री. मनोहरे यांनीही यावेळी मार्गदर्शन केले.
*****
0 Comments