*उदगीर शहरातील भुमीगत गटारासाठी १८० कोटीचा निधी मंजूर*
*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
उदगीर : मतदार संघाचा मास्टर प्लाॅन तयार करुन गेल्या ४ वर्षात नागरिकांना मुलभुत गरजा पुरविल्या असुन मतदार संघाचा चौफेर विकास करुन महाराष्ट्रात उदगीरचे नाव विकासाचा एक 'नवा पॅटर्न' निर्माण केला असुन शहरातील सर्व इमारती अद्यावत सुविधेसह पुर्णत्वाकडे जात आहेत. रस्ते, वीज, पाणी, आरोग्याच्या सुविधा, सर्व समाज घटकांना न्याय दिला. नागरीकांच्या आरोग्याला धोका निर्माण होवु नये व उदगीर शहर स्वच्छ व सुंदर दिसावे आणि शहरातील सर्व नालीचे पाणी शहराच्या बाहेर काढण्यासाठी राज्य शासनाच्या नगर विकास विभागातुन नगरोत्थान महाभियानांतर्गंत उदगीर शहरातील (भुमीगत गटार) मलनि:स्सारण प्रकल्पास पहिल्या टप्प्यात एकुण १८० कोटीचा निधी मंजूर केला असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
राज्यातील नागरी भागात मुलभूत पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी व त्यांचा दर्जा वाढविण्या करिता संदर्भाधीन क्रमांक ४ येथील शासन निर्णयाच्या तरतूदीन्वये नगरोत्थान महाभियान राबविण्यात येत आहे.
नगरोत्थान अभियानांतर्गत उदगीर नगरपरिषदेचा मलनि:स्सारण प्रकल्प नगरपरिषद प्रशासन संचालनालयामार्फत संदर्भाधीन क्र. ७ च्या पत्रान्वये राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीकडे सादर करण्यात आला होता. या प्रकल्पास मुख्य अभियंता, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, छत्रपती संभाजीनगर विभाग यांनी तांत्रिक मान्यता दिलेली आहे. त्यानुषंगाने राज्यस्तरीय प्रकल्प मान्यता समितीने दिनांक २३ फेब्रुवारी, २०२४ रोजी झालेल्या बैठकीमध्ये केलेल्या शिफारसीनुसार सदर प्रकल्पास प्रशासकीय मंजूरी देण्याची बाव शासनाच्या विचाराधीन होती. त्या प्रकल्पास काल दि.१५ मार्च रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात आली.
सदर भुमिगत गटारामुळे उदगीर शहरातील रोगराई नष्ट होणार असुन उदगीर शहर स्वच्छ व सुंदर होण्यास मदत होणार असल्याने उदगीर शहरातील नागरिकांनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
नगर विकास विभागातुन सदर निधी उपलब्ध करुन दिल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आभार व्यक्त केले आहेत.
0 Comments