निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी केली जिल्ह्यातील विविध स्थिर निगराणी पथकांची पाहणी
लातूर, दि. 18 : भारत निवडणूक आयोगाने लातूर लोकसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक खर्च निरीक्षक संजीव बॅनर्जी यांनी अहमदपूर, निलंगा, उदगीर आणि लातूर विधानसभा क्षेत्रातील स्थिर निगराणी पथकांना (एसएसटी) भेट देवून तेथील कामकाजाचा आढावा घेतला. तसेच उदगीर आणि निलंगा येत्घील सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात निवडणूक खर्च विषयक पथकांची आढावा बैठक घेवून प्रत्येकाने आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडण्याच्या सूचना दिल्या.
निलंगा येथील बैठकीला उपविभागीय अधिकारी तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शरद झाडके, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, निलंगाचे तहसीलदार प्रसाद कुलकर्णी, देवणीचे तहसीलदार गजानन शिंदे, शिरूर अनंतपाळचे तहसीलदार श्री.पेदेवाड, निलंगाचे गटविकास अधिकारी सोपान अकीले, गट विकास अधिकारी संतोष माने, नायब तहसीलदार सुधिर बिराजदार आदी उपस्थित होते.
निवडणूक खर्च संनियंत्रणासाठी गठीत करण्यात आलेल्या सर्व पथकांनी उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाचे लेखे अद्ययावत ठेवावेत. तसेच भारत निवडणूक आयोग, जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयामार्फत प्राप्त सूचनांप्रमाणे सर्व पथक प्रमुखांनी समन्वय ठेवून काम करावे. सी-व्हीजील अॅपवर प्राप्त होणाऱ्या तक्रारींचा निपटारा विहित वेळेत करावा. राजकीय पक्ष, उमेदवारांनी सादर केलेला खर्च आणि विविध पथकांकडून आलेल्या खर्चाची पडताळणी करून नियमानुसार कार्यवाही करावी, असे श्री. बॅनर्जी म्हणाले. स्टार प्रचारकाबाबत विहित केलेल्या मार्गदर्शक सूचनेप्रमाणे कार्यवाही करावी. स्थिर निगराणी पथके, भरारी पथके, व्हिडीओ निगराणी पथकांनी दक्ष राहून आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी, असे त्यांनी सांगितले.
*उदगीर सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात आढावा*
लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रात निवडणूक खर्चाच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या कार्यवाहीचा आढावा घेण्यासाठी निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी सुशांत शिंदे, जिल्हा परिषदेचे अतिरीक्त मुख्य कार्यकारी अधिकारी असलम तडवी, उदगीरचे तहसीलदार राम बोरगावकर, गट विकास अधिकारी संतोष माने यावेळी उपस्थित होते. कर्नाटक सीमा भागात असलेल्या स्थिर निगराणी पथकांनी अधिक सतर्क राहून काम करावे. तसेच याठिकाणी राज्य उत्पादन शुल्क आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांचीही नियुक्ती करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
*निवडणूक खर्च निरीक्षकांकडून स्थिर निगराणी पथकांची पाहणी*
निवडणूक खर्च निरीक्षक संजीब बॅनर्जी यांनी उदगीर मोड आणि औराद शहाजानी येथील स्थिर निगराणी पथकांना भेट देवून तेथील कामकाजाची माहिती घेतली. उदगीर विधानसभा मतदारसंघ क्षेत्रातील तोगरी आणि जळकोट येथील स्थिर निगराणी पथके, अहमदपूर मतदारसंघातील हाडोळती आणि लातूर शहर मतदारसंघातील महाराणा प्रतापनगर येथील स्थिर निगराणी पथकांचीही पाहणी करून कामाचा आढावा घेतला. हाडोळती येथील स्थिर निगराणी पथकाच्या भेटी प्रसंगी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी मंजुषा लटपटे उपस्थित होत्या.
****
0 Comments