जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली ईव्हीएम स्ट्राँग रुमची पाहणी
लातूर, दि. 04 : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी दोन दिवस उरले असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी मतदान यंत्र सुरक्षा कक्षाची (ईव्हीएम स्ट्राँग रूम) पाहणी केली. तसेच सुरक्षेच्या अनुषंगाने करावयाच्या उपाययोजनांचा आढावा घेत सूचनाही दिल्या.
याप्रसंगी पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, प्रभारी अपर जिल्हाधिकारी तथा उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, अतिरिक्त पोलीस अधीक्षक अजय देवरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देवेंद्र निळकंठ, लातूरचे तहसीलदार सौदागर तांदळे, नायब तहसिलदार पंकज मंदाडे तसेच सुरक्षा रूमसाठी कार्यरत विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
स्ट्राँग रुमची पाहणी करून जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी स्ट्राँग रुमच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही व्यवस्था आणि मतमोजणी कक्षाची पाहणी केली. स्ट्राँग रूम परिसरातील सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. त्याचबरोबर मतदान झाल्यानंतर मतदान यंत्रे (ईव्हीएम) घेवून येणाऱ्या वाहनांची व्यवस्था, वाहनांचा प्रवेश व बाहेर जाण्याचा मार्ग व पार्कींगच्या व्यवस्थेची पाहणी करत संबंधितांना अनुषंगिक सूचना दिल्या. स्ट्रॉंग रूमचे सीसीटीव्ही चित्रण निवडणूक सामान्य निरिक्षक, निवडणूक निरिक्षक (पोलीस) तसेच उमेदवार, उमेदवारांचे प्रतिनिधी यांना पाहता यावे, यासाठी करण्यात आलेल्या बैठक व्यवस्थेचीही पाहणी यावेळी केली.
पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी सीसीटीव्ही यंत्रणा चोवीस तास कार्यरत रहावी, यासाठी वीजपुरवठा अखंडीत ठेवण्याच्या सूचना देत बॅकअपसाठी ईनव्हर्टरची व्यवस्थाही करण्याचे निर्देश दिले.
0 Comments