*तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १४ कोटी ८१ लक्ष रुपयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाची मान्यता*
*क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांची माहिती*
*उदगीर* : शहरातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर गेल्या अनेक दशकापासून तालुक्यातील खेळाडूंनी विविध प्रकारच्या खेळांचा सराव करुन राज्य व देश पातळीपर्यंत मजल मारली आहे.
देशपातळीवर आपल्या उदगीर शहराचे नाव विविध क्रीडा प्रकारात या भागातील खेळाडूंनी गाजवले असुन आपल्या भागातील खेळाडुंना सर्व सुविधायुक्त मैदान उपलब्ध करून द्यावे म्हणून राज्याचे क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी उदगीर शहारातील जिल्हा परिषदेच्या मैदानावर तालुका क्रीडा संकुलाच्या उभारणीसाठी १४ कोटी ८१ लक्ष ४५ हजार रुपयाच्या अंदाजपत्रक व आराखड्यास शासनाची मान्यता देण्यात आली असुन आता क्रीडा संकुलाचे काम सुरु होणार असल्याची माहिती क्रीडा व युवक कल्याण, बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी दिली आहे.
उदगीर शहरातील जि.प. येथील सर्व्हे नं. ३०३/१ मधील १.८१ हे. आर अतिरिक्त व नविन जागा क्रीडा संकुल, उदगीर करिता उपलब्ध झाली होती. त्याठिकाणी फुटबॉल मैदान व इतर क्रीडा सुविधा उभारणीकरिता रु.९८९.६५ लक्षचे ढोबळ अंदाजपत्रक आराखड्यास यापूर्वी प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली होती. तथापि, संकुल समितीने या नवीन ठिकाणी प्रस्तावित सुविधांसाठी सदर रू. ९८९. ६५ लक्षचे ढोबळ अंदाजपत्रकामध्ये वाढ करुन रु.१४८१.४५ लक्ष चे सुधारीत व सविस्तर अंदाजपत्रक सादर केले होते. त्यामध्ये प्रशासकीय इमारत, फुटबॉल मैदान, समपातळीकरण, अंतर्गत रस्ते, संरक्षण भिंत गेटसह, पाण्याची व्यवस्था, स्टेजवर्क, लॅन्डस्केपींग हार्वेस्टींग, व्हॉलीबॉल मैदान, जॉगींगट्रॅक, क्रीकेटपीच, विद्युतीकरण आदी बाबींचा समावेश करण्यात आला आहे.
मागील काळात उदगीर शहरातील याच तालुका क्रीडा संकुलावर मिनिस्टर ट्रॉफी डे - नाईट फुटबॉलचे सामने व स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने 'राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा' घेऊन उदगीर शहराचे नाव क्रीडा क्षेत्रामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये क्रीडामंत्री संजय बनसोडे यांच्या माध्यमातून नावारूपाला आले. आपल्या भागातील खेळाडू भविष्यात देश पातळीवर चमकावे यासाठी क्रीडामंत्री संजय बनसोडे हे सतत धडपडत असतात त्यांच्या प्रयत्नामुळेच तालुका क्रीडा संकुलाचा कायापालट होणार असून या क्रीडा संकुलामुळे येत्या काळात ग्रामीण भागातील खेळाडू हे देश पातळीवर नेतृत्व करून आपल्या उदगीर शहराचे नाव मोठे करतील असा विश्वास क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी व्यक्त केला आहे.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी गेल्या वर्षभरात क्रीडा विभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर राज्यातील खेळाडूंसाठी भरघोस निधीची तरतूद करून खेळाडूंना न्याय दिला. त्यासोबतच ग्रामीण भागातील खेळाडुंनी देशपातळीवर जावून आपल्या शहराचे नाव मोठे करावे म्हणून खेळाडुंना सर्व सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी जि.प. मैदानावर तालुका क्रीडा संकुलाची उभारणी पुणे येथील बालेवाडीच्या धर्तीवर करण्याचा निर्धार केला आहे. यामुळे आपल्या ग्रामीण भागातील खेळाडुंना मोठ्या शहराच्या बरोबरीने सुविधा उपलब्ध होणार असल्याने खेळाडु, प्रशिक्षक, पालक व क्रीडाप्रेमींनी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांचे अभिनंदन करुन आभार व्यक्त केले आहेत.
*****
0 Comments