पंडित जवाहरलाल नेहरु विद्यालयाचे प्रयोग शाळा सहाय्यक 400 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
उदगीर: तोगरी येथील पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील जयप्रकाश बालाजी बिरादार, वय 45 वर्षे, पद प्रयोगशाळा सहायक, वर्ग-3, रा.विकास नगर, देगलूर रोड, उदगीर ता.उदगीर जि.लातूर यांनी 400 रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
थोडक्यात हकिकत यातील तक्रारदार यांची बहीण ही इयत्ता अकरावी व बारावी शिक्षणासाठी सन 2012-13 मध्ये पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर मध्ये शिक्षण घेत होती. सन 2013 मध्ये तिचे लग्न झाल्यानंतर तेव्हापासून ती मौजे मालेवाडी ता.गंगाखेड जि.परभणी येथे सासरी राहण्यास आहे.
महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेकरिता तक्रारदार यांच्या बहिणीस तिचा शाळा सोडल्याचा दाखला आवश्यक होता, म्हणून तिचा शाळा सोडल्याचा दाखला मिळणे बाबतचा विनंती अर्ज तक्रारदार (विद्यार्थिनीचा सख्खा भाऊ) याने दि. 08/07/2024 रोजी शाळेतील कार्यालयात दिला होता.
तक्रारदार यांनी दि.12/07/2024 रोजी शाळेत जाऊन त्यांचे बहिणीचा शाळा सोडल्याचा दाखला कधी मिळेल असे विचारले असता आरोपी लोकसेवक बिराजदार यांनी 400 रुपये घेऊन या व दाखला घेऊन जा असे सांगितल्याने तक्रारदार यांनी त्यांच्या बहिणीचे संमतीने लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, लातूर येथे लेखी तक्रार दिली. त्यावरून सापळा कार्यवाही आयोजित करण्यात आली.
आज दि. 16/07/2024 रोजी शासकीय पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली असता आरोपी लोकसेवक बिराजदार यांनी तक्रारदार यांच्याकडे 400/- रूपये लाचेची मागणी करून स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम पंडित जवाहरलाल नेहरू माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, तोगरी, ता.उदगीर, जि.लातूर येथील कार्यालयात शासकीय पंचासमक्ष स्वतः स्विकारली आहे.
आरोपी लोकसेवकास सापळा पथकाने लागलीच लाचेच्या रकमेसह रांगेहात पकडले. आरोपीस ताब्यात घेतले असून पोलीस स्टेशन देवणी, जि.लातूर येथे गुन्हा दाखल करण्याची पुढील प्रक्रिया सुरू आहे.डॉ.राजकुमार शिंदे पोलीस अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो, नांदेड परिक्षेत्र,पर्यवेक्षण अधिकारी श्री संतोष बर्गे पोलीस उप अधीक्षक,अँटी करप्शन ब्यूरो,लातूर यांनी सापळा रचून कारवाई केली आहे.
0 Comments