विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त नोडल अधिकारी यांनी आपली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी-जिल्हाधिकारी वर्षा-ठाकूर
• कामकाजाचे सूक्ष्म नियोजन करण्याच्या सूचना
लातूर, दि. २० : आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने विविध पथके स्थापन करण्यात आली आहे. या पथकांच्या नोडल अधिकाऱ्यांनी आपल्यावर सोपविलेली जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे दिल्या.जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित निवडणूक नोडल अधिकारी यांच्या बैठकीत त्या बोलत होत्या.
प्रभारी अपर जिल्हाधिकारी संगीता टकले, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. भारत कदम, उपजिल्हाधिकारी नितीन वाघमारे, अहिल्या गाठाळ, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रियांका आयरे, उपविभागीय अधिकारी शरद झाडके, अविनाश कोरडे, सुशांत शिंदे, रोहिणी नऱ्हे-विरोळे, मंजुषा लटपटे, जिल्हा नियोजन अधिकारी सोमनाथ रेड्डी, जिल्हा परिषदेचे मुख्य वित्त व लेखा अधिकारी आप्पासाहेब चाटे, प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय चव्हाण, समाज कल्याण सहायक आयुक्त शिवकांत चिकुर्ते यांच्यासह विविध पथकांचे नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते.
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक शांततेत आणि भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी आतापासूनच सूक्ष्म नियोजन करावे. प्रत्येक नोडल अधिकारी यांनी आपल्यावर सोपविलेल्या जबाबदारीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाच्या दिशानिर्देशांचा अभ्यास करून त्यानुसार कार्यवाही करावी. निवडणूक प्रक्रियेमध्ये कोणतीही त्रुटी राहू नये, यासाठी प्रत्येकाने खबरदारी घ्यावी, असे जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी सांगितले.
प्रारंभी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. कदम यांनी प्रत्येक पथकांचे नोडल अधिकारी, सहायक नोडल अधिकारी यांच्यावर सोपविण्यात आलेल्या जबाबदारीबाबत सविस्तर माहिती दिली.
*****
0 Comments