कृषी दिनानिमित्त प्रगतशील शेतकऱ्यांचा सत्कार
लातूर, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त १ जूलै रोजी जिल्हा परिषदेच्या यशवतराव चव्हाण सभागृहात कृषी दिनानिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांच्या हस्ते प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे, आत्माचे प्रकल्प संचालक शिवसांब लाडके, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ अरूण गुट्टे, मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. सचिन डिग्रसे, कृषी विकास अधिकारी सुभाष चोले, कृषी उपसंचालक महेश क्षीरसागर, उपविभागीय कृषी अधिकारी दिलीप जाधव, तालुका कृषी अधिकारी दिलीप राऊत यावेळी उपस्थित होते.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कृषी विद्यावेत्ता डॉ. अरूण गुट्टे यांनी यावेळी सोयाबीन लागवडीचे तंत्रज्ञान आणि गोगलगाय व्यवस्थापन याविषयी मार्गदर्शन केले.
मांजरा कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ संदीप देशमुख यांनी सोयाबीन व तूर पिकावरील किड व रोग नियंत्रण बाबतीत मार्गदर्शन केले. जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी रक्षा शिंदे यांनी कृषी संजीवनी सप्ताह समारोप प्रसंगी मोहीमेत टोकण पद्धतीने लागवड व रूंद वरंबा सरी पद्धतीने लागवड तंत्रज्ञान जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न केला त्याबद्दल कृषी विस्तारकांचे कौतुक केले.
विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर यांनी हरितक्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या कृषी विषयक कार्याची उपस्थितांना आठवण करून दिली. सामूहिक गोगलगाय व्यवस्थापण करावे, संरक्षित पाण्याची सोय तयार करून ठेवावी, 100 % बीजप्रक्रिया करावी, आंतरपीकांचे क्षेत्र वाढवावे, कृषी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी प्रत्यक्ष बांधावर जावून मार्गदर्शन करावे, अशा सूचना दिल्या.
मुख्य कार्यकारी अधिकारी अभिनव गोयल यांनी शेतीसोबत पूरक व्यवसाय उभारावेत. विविध योजनेचा लाभ घेऊन फळबाग लागवड, शेततळे, दालमील, शेतकरी उत्पादक कंपण्यानी प्रक्रिया उद्योग उभारणी करावी. जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत योजना पोहचवाव्यात. रासायनिक खतांमूळे जमिनीची प्रत कमी होतेच परंतु मानवी आरोग्यावरही दूष्परिणाम होतात. त्यामुळे सेंद्रीय घटकांचा वापर वाढवावा. हवामानातील बदलामुळे होणारे दूष्परिणाम यावर नियंत्रण करण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्यासाठी व शाश्वत उत्पन्न वाढवून विकास निर्देशांक वाढविण्यासाठी अधिकारी कर्मचारी यांनी प्रयत्न करावेत, अशा सूचना दिल्या.
याप्रसंगी राज्यस्तरीय पीक स्पर्धेत प्रथम द्वितीय व तृतीय क्रमांक पटकाविलेल्या शेतकऱ्यांचा मान्यवरांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कृषी उपसंचालक गोपाळ शेरखाने, उद्यान पंडित पुरस्कारप्राप्त शेतकरी प्रकाश झुंज पाटील यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
सूत्रसंचालन उद्धव फड व कृषी पर्यवेक्षक सूर्यकांत लोखंडे यांनी केले, उपस्थितांचे आभार जिल्हा कृषी अधिकारी भूजंग पवार यांनी मानले. याप्रसंगी जिल्ह्यातील कृषी विभागातील अधिकारी कर्मचारी व प्रगतशील शेतकरी उपस्थित होते.
*प्रगतशील शेतकऱ्यांचा सन्मान*
खरीप हंगाम 2022 मधील राज्यस्तरीय पीक स्पर्धेत तूर पिकात राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त जयश्री डोणगापूरे (रावणगाव), विभागात प्रथम नागनाथ बिरादार (माळेवाडी), सोयाबीन पिकात प्रथम बाबूराव सुरवसे (वांजरखेडा), जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक गूलाब शेख (जाजनूर), अजित होणमाने (कारेवाडी), बापूराव रक्षाळे (लोहारा), तूर पिकात जिल्हास्तरावर अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक रामेश्वर बिरादार (बनशेळकी), देवता शिखरे (तोगरी), मधुकर मोरे (वायगाव) यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
0 Comments