*निक्षय मित्र बनूया, जिल्हा क्षयरोगमुक्त करूया -जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे*
लातूर, दि. 20 : आपला जिल्हा क्षयरोगमुक्त करण्याच्या मोहिमेत सर्वांचा सहभाग आवश्यक आहे. क्षयरुग्णांना पोषणयुक्त आहार उपलब्ध करून देण्यासाठी निक्षय मित्र बनून नागरिकांनी या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी आज येथे केले.
राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या क्षयरुग्णांसाठी अन्नदाता उपक्रमप्रसंगी श्रीमती ठाकूर-घुगे बोलत होत्या. निवासी उपजिल्हाधिकारी केशव नेटके, रोहयो उपजिल्हाधिकारी अहिल्या गाठाळ, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. एच. व्ही. वडगावे, महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री. सांगळे, नगरपालिका प्रशासनचे जिल्हा सहआयुक्त रामदास कोकरे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. एस. एन. तांबारे, नायब तहसीलदार परवीन पठाण यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
क्षयरुग्णांना मदत करताना केवळ फूड बास्केट (सकस आहार किट) देणे हाच उद्देश नसून निक्षय मित्र बनून त्यांचे मनोबल वाढविणे आवश्यक असलेचे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांनी यापुढे स्वतःचा वाढदिवस निक्षय मित्र बनून अथवा इतर कोणत्याही विधायक उपक्रमात सहभागी होवून साजरा करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी यावेळी केले.
क्षयरुग्णांना मोफत उपचारासोबतच, मोफत निक्षय पोषण योजना व लोकसहभागातून प्रथिनेयुक्त आहार देणेसाठी फुड बास्केटचे वितरण करण्यात येत आहे. लातूर जिल्हयात एक हजार 900 पेक्षा अधिक क्षयरुग्ण उपचार घेत आहेत. सर्वच रुग्णांना मोफत औषधोपचार पुरविला जात असून त्यातील एक हजार 300 क्षयरुग्णांना सामाजिक संस्था, व्यावसायिक संघटना, अधिकारी-कर्मचारी, पत्रकार यांच्यावतीने फूड बास्केट पुरविण्यात आले आहेत. उर्वरित 600 पेक्षा अधिक रुग्णांना व नवीन निदान होणाऱ्या रुग्णांना फूड बास्केट देण्यासाठी प्रातिनिधिक स्वरुपात कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी 25 रुग्णांना त्यांचे नातेवाईकांमार्फत फूड बास्केट जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले.
जिल्ह्यात क्षयरुग्णांसाठी अन्नदाता उपक्रम राबवून गेल्या दहा ते पंधरा दिवसामध्ये 176 निक्षय मित्र जोडले गेले असून 250 पेक्षा अधिक रुग्णांना फूड बास्केटची मदत केली आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वडगावे यांनी दिली.
जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांनी स्वतः निक्षय मित्र बनून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. त्यामुळे आरोग्य विभागाच्यावतीने जिल्हाधिकारी श्रीमती ठाकूर-घुगे यांना निक्षयमित्र म्हणून प्रमाणपत्र देण्यात आले.
0 Comments