आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी स्थापन सर्व पथकांनी कार्यवाही गतिमान करावी-अनमोल सागर
लातूर, दि. 15 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक काळात आदर्श आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके स्थापन करण्यात आली आहेत. या सर्व पथकांनी आपली कार्यवाही गतिमान करण्याच्या सूचना आदर्श आचारसंहिता कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांनी आज येथे दिल्या.
जिल्हा परिषदेच्या बैठक सभागृहात आयोजित आढावा बैठकीत श्री. सागर बोलत होते. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक केशव राऊत, निवडणूक खर्च संनियंत्रण कक्षाचे नोडल अधिकारी तथा जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी अप्पासाहेब चाटे, कोषागार अधिकारी उज्ज्वला पाटील, सीव्हीजील कक्षाचे नोडल अधिकारी बालाजी मरे, आदर्श आचारसंहिता कक्षाचे सहायक नोडल अधिकारी जावेद शेख आदी यावेळी उपस्थित होते. तसेच सर्व तालुकास्तरीय नोडल अधिकारी, भरारी पथके व स्थिर निगराणी पथकांचे प्रमुख दूरदृश्य प्रणालीद्वारे या बैठकीत सहभागी झाले होते.
आदर्श आचारसंहिता अंमलबजावणीसाठी सर्वांनी दक्ष राहून काम करावे. अवैध मद्यविक्री अथवा वाहतूक, मतदारांना प्रलोभने दाखविण्यासारखे प्रकार रोखण्यासाठी भरारी पथके, स्थिर निगराणी पथके यांनी सतर्क राहून काम करावे. विशेषतः सीमा भागात भरारी पथकांनी पोलीस आणि राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या मदतीने अवैध दारू विक्री, तसेच प्रतिबंधित पदार्थांची विक्री होवू नये, यासाठी मोहीम राबवावी. जिल्ह्यात होणाऱ्या राजकीय सभा, रॅली आणि इतर कार्यक्रमांचे संनियंत्रण करून त्याबाबतचा अहवाल निवडणूक खर्च कक्षाला नियमितपणे सादर करावा, अशा सूचना श्री. सागर यांनी दिल्या.
गट विकास अधिकारी, नगरपालिका मुख्याधिकारी यांच्यावर शहर, तालुका स्तरावर आदर्श आचारसंहिता कक्षाची जबाबदारी सोपविण्यात आली असून त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील भरारी पथके, स्थिर निगराणी पथके यांच्याशी सातत्याने समन्वय ठेवून कामकाज अधिक प्रभावी होईल, याची दक्षता घेण्याच्या सूचनाही श्री. सागर यांनी यावेळी दिल्या.
*****
0 Comments