उदगिरात दुचाकीस्वारास लायसन्स विचारणाऱ्या पोलीसावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न व मारहाण करुन केले गंभीर जखमी..
उदगीर : प्रतिनिधी
उदगीर शहरातील ईच्छापुर्ती हनुमान मंदीराचे पुढे पॉवर हाउस समोर रोडवर दुचाकीस्वारास हात करुन थांबाण्यास सांगितले असता पोलीस हेडकाँस्टेबलच्या अंगावर दुचाकी घालण्याचा प्रयत्न करुन शर्टाची काॅलर धरून कानशिलात, चापटाने, लाथाबुक्यानी मारुन गंभीर जखमी केले. याप्रकरणी रविवारी (२३ फेब्रुवारी) सायंकाळी चारच्या सुमारास दुचाकीस्वाराच्या विरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, २३ फेब्रुवारी रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास उदगीर - नांदेड रोडवरील ईच्छापुर्ती हनुमान मंदीराचे पुढे पॉवर हाउस समोर रोडवर फिर्यादी पोलीस हेडकाँस्टेबल हे पोलीस ठाणे हद्दीत मोटार वाहन केसेस करीत असताना यातील आरोपीस त्याची मोटारसायकल क्रं. एम.एच.२४ बी.सी.८०१७ ही हाताचा ईशारा करुन थांबविण्यास सांगितले असता दुचाकीस्वाराने त्याची दुचाकी फिर्यादीचे अंगावर घालण्याचा प्रयत्न केला. पंरतु फिर्यादी हे बाजुला सरकुन पुढे जाउन थोडया अंतरावर त्यास थांबवुन लायसन्स बाबत विचारणा केली असता यातील आरोपीने फिर्यादीस तु मला कोण लायसन्स विचारणारा असे म्हणुन कॉलर धरुन चापटाने, बुक्याने मारहाण करुन जखमी केले व शासकीय कामात अडथळा निर्माण केला आहे.
याप्रकरणी पोलीस हेडकाँस्टेबल युसुफअली मुर्तुजअली धावडे (पोलीस ठाणे उदगीर ग्रामीण) यांच्या फिर्यादीवरून उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात गु.र.नं. ९४/२०२५ कलम १३२, १२१(१), ११५(२) भारतीय न्याय सहिंता २०२३ नुसार दुचाकीस्वार ईस्माईल जाफरसाब शेख (रा. मांडुरकी ता. चाकुर) याच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश कदम हे करीत आहेत.
0 Comments