लोहारा जवळ टँकरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू;
उदगीर - लातूर राज्य मार्गावरील लोहारा - नरसिंगवाडी दरम्यान भरधाव वेगात असलेल्या टँकरने दुचाकीस्वाराला समोरून जोराची धडक दिल्याने दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी सोमवारी २५ नोव्हेंबर दुपारी दिडच्या सुमारास उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टँकर चालकविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बळीराम व्यंकट वाघे (वय ३१ वर्षे, रा.धोतरवाडी ता.उदगीर असे मृताचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, १९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास लोहारा पाटी ते नरसींगवाडी पाटीचे दरम्यान पूलाचे जवळ आरोपीने त्याचे ताब्यातील वाहन हयगय व निष्काळजीपणे चालवून फिर्यादीचा मूलगा चालवत असलेली दुचाकी क्र एम एच १४ ए क्यू ५६६८ या दुचाकीला टँकर क्र एम एच २४ जे ८२९२ या अशोक लिलॅंड कंपनीचे टॅंकर ने समोरून जोराची धडक देवून डोक्याला मार लागून गंभीर जखमी करून त्याचे मरणास कारणीभूत झाला आहे.
याप्रकरणी व्यंकट माधवराव वाघे रा.धोतरवाडी ता.उदगीर यांच्या फिर्यादीवरुन उदगीर ग्रामीण पोलीस ठाण्यात टँकर चालकविरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक देवकते हे करीत आहेत.
0 Comments