जागृती सहकारी साखर कारखान्याचा विविध मान्यवरांच्या हस्ते गळीत हंगामाचा शुभारंभ पार पडला
देवणी:तालुक्यातील जागृती सहकारी साखर कारखानाच्या १२ व्या गळीत हंगामाचा शुभारंभ कराड येथील कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुलबाबा भोसले, कारखान्याच्या अध्यक्षा सौ. गौरवीताई भोसले या दांपत्याच्या हस्ते विधीवत पूजन करुन करण्यात आला. अत्यंत उत्साहवर्धक वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास उपस्थित राहुन यशस्वी गळीत हंगामासाठी तसेच परिसरातील शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या जागृती कारखान्याच्या गळीत हंगाम शुभारंभ प्रसंगी सहकार महर्षी,माजी मंत्री दिलीपराव देशमुख,सौ.सुवर्णाताई देशमुख,आमदार अमित देशमुख, आमदार धीरज देशमुख,प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस अशोकराव पाटील निलंगेकर यांच्यासह अनेक मान्यवर व मोठ्या संख्येने शेतकरी,कर्मचारी, कामगार उपस्थित होते.
साखर कारखानदारीमुळे पश्चिम महाराष्ट्रात जे परिवर्तन घडले आहे त्यातून प्रेरणा घेऊन माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी लातूर येथे मांजरा कारखान्याची उभारणी केली.मराठवाड्यातही साखर कारखानदारी यशस्वीरीत्या चालू शकते हे त्यांनी दाखवून तर दिलेच शिवाय या मागास भागात कल्पकतेने साखर कारखाना चालवला तर तो देशात आदर्श ठरू शकतो हेही दाखवून दिले.
मांजरा कारखान्याच्या यशस्वीतेनंतर येथे कारखानदारीचा मांजरा परिवार निर्माण करुन तो आदर्श पद्धतीने चालवण्यात प्रमुख भूमिका निभावणारे दिलीपराव देशमुख यांनी जिल्ह्याचा समतोल विकास साधण्यासाठी देवणी परीसरात जागृती कारखान्याची उभारणी केली.
सौ.गौरवीताई भोसले यांच्या नेतृत्वात जागृती साखर कारखान्यानेही उत्तुंग भरारी घेतली असून त्यातून या परिसराचा कायापालट झाला आहे.आगामी काळात या कारखान्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प उभारून परिसरातील जनतेचा सर्वांगीण विकास साधला जाईल,असा विश्वास ही यावेळी आमदार अमित देशमुख यांनी बोलताना व्यक्त केला.
0 Comments