*उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव, मोघा महसुली मंडळांचा दुष्काळ घोषित केलेल्या महसुली मंडळात समावेश करा!*
*क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली मागणी*
-------------------------
*उदगीर* : उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव व मोघा या महसुली मंडळांचा राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या महसुली मंडळात समावेश करून विशेष सवलती लागू करण्यासंदर्भात क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी बुधवारी आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची भेट देऊन मागणी केली.
उदगीर मतदार संघातील सर्वच महसुली मंडळांमध्ये दुष्काळ सदृश्य परिस्थिती निर्माण झाली. परंतु राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या ४० तालुक्यांमध्ये काही महसुली मंडळांचा समावेश करण्यात आला. त्यात उदगीर तालुक्यातील तोंडार, नागलगाव व मोगा या महसुली मंडळात जून ते सप्टेंबर २०२३ या कालावधीमध्ये ७५ टक्के पेक्षा कमी पर्जन्यमान झाले. तसेच जून ते सप्टेंबर या कालावधीत २१ दिवसांचा पावसाचा खंड पडून खरीप पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. त्यामुळे या महसुली मंडळाचा राज्यातील दुष्काळ घोषित केलेल्या महसूल मंडळात समावेश करून विशेष सवलती लागू कराव्या अशी मागणी क्रीडामंत्री संजय बनसोडे यांनी राज्याचे आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांच्याकडे केली.
क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्या मागणीचा सकारात्मक विचार करून त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी प्रशासनाला दिले आहेत.
0 Comments