दक्षिण मध्य रेल्वेच्या उपभोक्ता सल्लागार समिती सदस्यपदी मोतीलाल डोईजोडे
केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांची शिफारस
उदगीर : उदगीर येथील रेल्वे अभ्यासक तथा रेल्वे संघर्ष समितीचे सचिव मोतीलाल डोईजोडे यांची केंद्रीय अपारंपरिक ऊर्जा, खते व रसायने राज्यमंत्री ना. भगवंत खुबा यांच्या शिफारशीनुसार दक्षिण मध्य रेल्वेच्या उपभोक्ता समिती सल्लागार सदस्यपदी पुनर्निवड करण्यात आली आहे. नुकतेच केंद्रीय राज्यमंत्री खुबा यांनी डोईजोडे यांना नियुक्तीचे पत्र उदगीर येथे एका कार्यक्रमात प्रदान केले.
मोतीलाल डोईजोडे गेल्या अनेक वर्षांपासून रेल्वेच्या प्रश्नांवर संघर्ष करीत असून दक्षिण मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य म्हणून त्यांची तिसऱ्यांदा नियुक्ती झाली आहे. मोतीलाल डोईजोडे हे मराठवाड्यातील रेल्वे अभ्यासक आहेत. या भागातील रेल्वेच्या प्रश्नांची त्यांना पूर्णपणे जाणीव असून सीमाभागातील रेल्वेचे अनेक प्रश्न सोडविण्यात त्यांचे महत्वपूर्ण योगदान राहिले आहे. उदगीर येथील रेल्वेस्थानक विकासातही डोईजोडे यांचे मोलाचे योगदान आहे. उदगीर रेल्वे स्थानकातून अधिकाधिक रेल्वे जाव्यात येथील प्रवाशांना योग्य त्या सुविधा मिळाल्या पाहिजेत यासाठी मोतीलाल डोईजोडे यांचा नेहमीच प्रयत्न असतो. त्यांच्या सर्व रेल्वेविषयक कामाची दखल घेऊन केंद्रीय राज्यमंत्री भगवंत खुबा यांनी दक्षिण मध्य रेल्वेच्या उपभोक्ता समितीच्या सल्लागार सदस्यपदी निवडीसाठी शिफारस केली.
ना. खुबा हे नुकतेच उदगीर दौऱ्यावर आले असता एका कार्यक्रमात त्यांनी मोतीलाल डोईजोडे यांना सदरील निवडीचे पत्र दिले. यावेळी माजी राज्यमंत्री आ. संजय बनसोडे, माजी आ. सुधाकर भालेराव, गोविंद केंद्रे, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस बसवराज पाटील नागराळकर, प्रा. बी. व्ही. मोतिपवळे, रेल्वे संघर्ष समितीचे अध्यक्ष रमेश अंबरखाने, माजी नगराध्यक्ष बसवराज बागबंदे, भाजपचे शहराध्यक्ष मनोज पुदाले आदींची उपस्थिती होती. या निवडीबद्दल मोतीलाल डोईजोडे यांचे सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे.
0 Comments